सर्व प्रकारच्या धार्मिक कार्यांना, दिनारंभाला सुरुवात होते ती “ श्री गणेशाय नमः “ , “ श्री कुलदेवताय नमः “ या प्रार्थनेने ! प्रथम श्री गणेश वंदन होते आणि मग कुलदेवतेचा मान असतो. संपूर्ण कुलाचे रक्षण करणारी, वृद्धी करणारी, प्राप्त झालेले सुख – शांती – समाधान उपभोगण्याची शक्ती देणारी ती कुलदेवता.
प्रत्येक घराण्याला एक किंवा दोन कुलदेवता आहेत. त्या तश्या का ठरल्या याचे कारण असे :
फार वर्षापूर्वी ज्यावेळी ऋषीमुनींचा काळ होता त्यावेळी त्या कुटुंबाला “ गोत्र “ अशी संज्ञा होती. या कुटुंबावर काहीही संकट ओढवले तर त्याचे निवारण प्रमुख ऋषी आपल्या तपःसामर्थ्याने करीत असत. म्हणून त्या गोत्राचे ते ऋषी ठरले. कालांतराने जेव्हा ऋषींनी आपले अवतार कार्य संपवून समाधी घेण्याचे ठरविले तेव्हा असा प्रश्न पडला कि आता या कुलाचे रक्षण कोण करणार ? म्हणून त्यावेळी निरनिराळ्या ऋषींनी निरनिराळ्या ठिकाणी समाधी घेण्यापूर्वी एक किंवा दोन देवतांना प्रसन्न करून घेतले व आपल्या गोत्राच्या, कुळाच्या रक्षणाची जबाबदारी त्या त्या देवतेवर सोपविली व कुळातील सर्वांना अशी आज्ञा केली कि माझे पश्चात आपल्या रक्षणासाठी या प्रसन्न केलेल्या देवतांना प्रसन्न ठेवा. याच देवता पुढे या कुळाचे, गोत्राचे रक्षण करतील. तेव्हापासून प्रत्येक कुळाची एक देवता ठरली. ज्याप्रमाणी आई आपल्या मुलांचे पालनपोषण अत्यंत ममतेने करते तसेच पालनपोषण व्हावे ह्या हेतूने विशेष करून स्त्री शक्ती देवताच कुलदेवता झालेल्या आहेत. उदाहरणार्थ करवीर निवासिनी महालक्ष्मी, तुळजाभवानी, अंबेजोगाई, शाकंबरी, एकवीरा, खंबांबा देवी वैगरे. काही ठिकाणी शिव व शक्ती अशा दोन्ही कुलदेवता आहेत. उदाहरणार्थ श्री व्याघ्रेश्वर – योगेश्वरी, लक्ष्मी नारायण, लक्ष्मी व्यंकटेश, ज्योतिर्लिंग – यमाई वैगरे. म्हणुन कोणत्याही शुभ कार्याला सुरूवात करतांना गणेशाला, कुलदेवतेला आणि गोत्र ऋषीचा उच्चार केला जातो.
कुलावर देवतेचे अधिपत्य निर्माण झाल्यावर त्या त्या देवतेच्या स्तुती स्तोत्रात सांगितल्याप्रमाणे त्या त्या देवतेचे उत्सव साजरे करण्याची प्रथा सुरू झाली. त्यालाच “ कुलाचार ” म्हणतात. वर्षभर नित्यपूजन व वर्षातून एकवेळ नवरात्र उत्सव साजरे होते. त्यावेळी ब्राह्मण - सुवासिनी - कुमारिका पूजन, अभिषेक, सप्तशती पाठ, गोंधळ भरणे, बोंडण भरणे वैगरे कुळाचार सुरू झाले.