सर्व मंगल मांगल्ये शिवेसर्वार्थ साधिके । शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते ॥

खंबांबा मातेचे हिंगणी ग्रामात आगमन

मातेचे मूळस्थान सातपुडा पर्वताच्या उत्तरेकडील भागात होते. तेव्हा नंदूरबार येथील खंबांबा मातेचे निस्सिम भक्त श्री. उपासनी महाराज हे नित्य नेमाने मातेच्या दर्शनास जात असत. मात्र पुढे वृद्धापकाळाने त्यांना दर्शनास जाणे अवघड होऊ लागले. म्हणुन त्यांना खंतावलेले पाहून मातेने त्यांना सांगितले कि तू इतक्या दूरवर येण्याची जरुरी नाही. मीच तुझ्या घरी येणार आहे. तरी तू मार्गक्रमण कर. मी तुझ्या मागे मागे येईल. मात्र तू जर मागे वळून पाहिलेस तर मी त्याच ठिकाणी थांबेन आणि तेथेच वास्तव्यास राहीन. उपासनी महाराज नंदूरबारकडे मार्गक्रमण करू लागले. मागोमाग खंबांबा माता होतीच. महाराजांनी तापी नदी ओलांडली, नंदनगरी दृष्टीपथात येऊ आगली होती. पण त्यांना मागे वळून बघण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनी मागे वळून बघताच क्षणभरासाठी मातेचे दर्शन झाले. ती म्हणाली, “ भक्ता, तू माझा शब्द पाळला नाहीस. तेव्हा मी आता येथेच थांबणार !” असे म्हणून मातेचे एका दगडी खांबात रूपांतर झाले. महाराज अत्यंत निराश झाले. परंतू त्यांनी हिंमत सोडली नाही. माणसे आणि बैलगाड्या मागवून त्यांनी तो दगडी खांब नंदनगरीत नेण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र त्यांना यश आले नाही. अखेरीस पाथरवटांकडून खांबात मातेची मूर्ती कोरून घेतली आणि त्याठिकाणी मंदिर बांधले.

हे पवित्र ठिकाण म्हणजे आजचे हिंगणी हे गाव आणि खांबाप्रमाणे घट्ट पाय रोवून राहिलेली देवी म्हणजे ही आपली "खंबाअंबा" देवी होय.


( साभार – श्री. सुहास दत्तात्रय चौक, धुळे )