सर्व मंगल मांगल्ये शिवेसर्वार्थ साधिके । शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते ॥

खंबाम्बा माता अवतरण

जेव्हा जेव्हा दुष्ट शक्तींनी अनाचार, अत्याचार यांची परिसीमा गाठली तेव्हा तेव्हा दैवी शक्तींनी त्यांचा नाश करून प्रजेला सुख-शांती-समृद्धी प्राप्त करून दिलेली आहे. अशाच एका कालावधीत ब्रह्मा – विष्णू – महेश यांच्या उग्र उपासने अंती इच्छित वरदाने प्राप्त झाल्यामूळे दैत्य समूह उन्मत्त झालेला होता आणि दीनदुबळ्या जनतेवर अत्याचार करू लागला होता. त्यातून सुटका होण्यासाठी तत्कालीन ऋषीमुनींनी आदिशक्तींची करुणा भाकली. त्यामुळे प्रसन्न होऊन नवदुर्गांच्या रूपाने महामाता आदिशक्ती भूतलावर अवतरली. तिने नवदुर्गांना विविध सिद्धी व शस्त्रे – अस्त्रे प्रदान करून दुष्ट दैत्य समूहाचे निर्दालन करण्याचे आदेश दिले.

नवदुर्गांनी त्या त्या परिसरात जाऊन दैत्य समूहाशी घनघोर संग्राम करून अनेक दैत्यांचा संहार केला. यातून जे वाचले ते दैत्य दाहीदिशांना पसार झाले व अरण्यात वेगवेगळ्या श्वापदांच्या रूपात वास्तव्य करू लागले. तेव्हा नवदुर्गांनी अनेक अवतार घेऊन त्या दैत्यांना शोधून काढले व त्यांचा संहार केला.

नवदुर्गांच्या अवतारांपैकी सातपुडा पर्वतराजीतील जनतेला असुरांपासून मूक्त करणारी दुर्गा ही “ खंबाम्बा माता “ म्हणून ओळखली जाते.

कुलावर देवतेचे अधिपत्य निर्माण झाल्यावर त्या त्या देवतेच्या स्तुती स्तोत्रात सांगितल्याप्रमाणे त्या त्या देवतेचे उत्सव साजरे करण्याची प्रथा सुरू झाली. त्यालाच “ कुलाचार ” म्हणतात. वर्षभर नित्यपूजन व वर्षातून एकवेळ नवरात्र उत्सव साजरे होते. त्यावेळी ब्राह्मण - सुवासिनी - कुमारिका पूजन, अभिषेक, सप्तशती पाठ, गोंधळ भरणे, बोंडण भरणे वैगरे कुळाचार सुरू झाले.

श्री खंबाम्बा मातेने सातपुडा पर्वत आणि तापी नदीचा परिसर येथील रेड्याच्या रूपातील दैत्याचा वध करून या भागातील प्रजेला भयमुक्त केले. पुढे याच परिसरात जनकल्याणार्थ गुहारूपाने वास्तव्य केले

( साभार – श्री. सुहास दत्तात्रय चौक, धुळे )